Saturday, 26 September 2015

शब्द हे शब्द ना...

एखाद्या कवीला , लेखकाला सर्वात जास्त विचारण्यात येणारा प्रश्न असतो ,
"तुम्हाला हे कसं काय सुचत रावं? कुठून येतात हे विचार ? कुठून येतात हे शब्द? "
खर सांगायच तर स्वतःला लिहणार्याला सुद्धा स्पष्ट माहित नसतच एखाद्या विचाराच
मुळ उगमस्थान .. सभोवताली एवढं सगळ घडत असतं की ते सगळ संवेदनशील
मनाच्या वहीवर आपोआप टिपल्या जात असतं .आणि मग एखाद्या क्षणाला जो
क्षण खरतर निर्माण करता येत नाही ..त्याची वाट पहावी लागते .. दुध जस उतु जात ना
फसफसंत किंवा मग बादली भरते पाण्याची पुर्ण तसंच काहीस होत मनात सुद्धा..
आणि मग तो क्षण येतो.
ही माझी  कविता ह्याच प्रश्नाचा शोध घेता घेता सुचलीय..




शब्द हे शब्द ना
दिवसभर
माझ्या मनाशी
खेळत असतात ....
कधी एवढा पिंगा घालतात
नुसते नाचतात ,
उरावरच बसतात.
अन कधी माझ्याच
नजरेशी लपंडाव खेळतात.
हे शब्द हे शब्द ना
दिवसभर
माझ्या मनाशी
खेळत असतात ....
मग मध्य रात्रीला
काय होत की अचानक
जाग येते अन
उठून मी पाहतो तर
काय ??
सगळे तेच शब्द
नाचून नाचून
थकलेले भागलेले,
अन लपून छपुन
कंटाळलेले शब्द.
माझ्या मनाच्या
दुलई वरती येउन पडतात..
हे शब्द हे शब्द ना
दिवसभर
माझ्या मनाशी
खेळत असतात ....
कस काय ते माहीत नाही पण
मला मग त्यांची खूप
दया यायला लागते.
दिवसभर मला त्यांनी दिलेला
त्रास त्याचा मला
विसर पडायला होते.
मग मी बाळाला आईने
कडेवरती घ्यावं
तस प्रत्येक शब्दाला
कोऱ्या कागदावर
उतरवतो.
आणि ते खुदू खुदु
हसायला लागतात,
ताला सुरात पुन्हा
नाचायला लागतात.
कधी कधी यालाच
काही लोकं मग
कविता अस हि म्हणतात.
हे शब्द हे शब्द ना
दिवसभर
माझ्या मनाशी
खेळत असतात ....
~~
रोशन 


No comments:

Post a Comment