Friday, 13 January 2017

जादुगार.

माझ्या नव्या स्वप्नांचा उगम होतो,
जुन्या स्वप्नांच्या राखेतुन.
आणि तू हातांची घडी घालुन अचंबित उभा असतोस,
एखाद्या प्रेक्षकासारखा.
तुला माहित नाही की,
कित्येकदा स्वप्नांच्या राखेतुनच
जन्म घेत असतात
नवी कोरी स्वप्न.
मी तुझ्यासमोरच घडवत असतो,
मुठभर राखेतुन नविन स्वप्नांना.
गेल्या स्वप्नांपेक्षाही मोठी,
मोठी आपल्या उंचीपेक्षाही.
ज्या परीघाकडे तू
साशंकित नजरेने पाहत असतोस
तो मीच खेचलाय चोहीकडुन,
ती रेघ म्हणजे स्वाभिमान.
तू भित्रा आहेस कारण,
तू माझ्या हट्टाने बिथरुन जातोस.
विचलित होतोस तू
जेव्हा मी पुटपुटतो मंत्र.
माझ्या कपड्यांवर,माझ्या पिशवीवर,
तुझा अविश्वास विसंबुन आहे.
मी पाहिलय जेव्हा
मी पाहत असतो आभाळाकडे
तेव्हा तू धडपड करतोस
मागे सारण्यासाठी
जेणेकरुन देवाने जर
माझ्यावर फेकुन मारला
कुठला अभिशाप वा संकट
तर त्याचे शिंतोडे तुझ्यावर उडू नये.
तू फक्त एक प्रेक्षक आहेस.
आश्चर्याने,भितीपोटी आणि रोमांचित
होऊन तू टाळ्या पिटतोस खरा,
पण मुळात तुला हवयं
माझी सगळी गुपित उघड व्हावीत
आणि तुला जोरजोरात हसता याव
की मी सुद्धा शेवटी
सर्वसाधारणच निघालो.
माझ्यासाठी तू फक्त परीघापलीकडची गर्दी आहेस.
जिचा खरतर चेहरा सुद्धा नाही
आणि मी ...
मी आहे स्वतःच्या
अस्तित्वाच एकमेव कारण .
मी आहे माझ्या आयुष्यातला खरा जादुगार.
 

-आनंद बाजपेयी


#rosswords
 #translations

No comments:

Post a Comment